चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:31 PM2021-09-19T19:31:19+5:302021-09-19T19:35:28+5:30
मुंबई पोलिसांनी कार्यालयात डांबल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; भाजप नेते संतप्त
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या चर्चेत आले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत. ही नोटीस किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना स्थानबद्ध केले आहे.
मुंबई पोलिसांच्या कारवाईबद्दल किरीट सोमय्यांनी संताप व्यक्त केला. माझ्याच कार्यालयात मला ४ तास डांबून ठेवण्यात आलं. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना योग्य उत्तर देऊ, असं सोमय्या म्हणाले. जिल्हा बंदीची नोटीस देण्यात आली असली, तरी कोल्हापूरात जाणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल
उद्या कोल्हापूर दौरा करणार असून अजिबात मागे हटणार नाही, असं सोमय्या म्हणाले. येणाऱ्या काही दिवसांतले काही कार्यक्रमदेखील त्यांनी सांगितले. उद्या (२० सप्टेंबर) कोल्हापूरला जाऊन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांची पाहणी करणार. त्यानंतर २३ सप्टेंबरला पारनेरमधल्या साखर कारखान्याची पाहणी करणार. २७ सप्टेंबरला अलिबागला जाऊन कोलाईमध्ये रश्मी ठाकरेंच्या बंगल्याची पाहणी करणार आणि ३० सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.
भाजप नेत्यांची ठाकरे सरकारवर टीका
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
माजी खारदार किरीट सोमय्या यांच्या घराच्या बाहेर १०० पोलिसांनी गराडा घातला आहे. किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर. दहशतवादी उजळ माथ्याने फिरताहेत. मुंबईमध्ये घातपात करण्यासाठी, बॉम्बस्फोट करण्यासाठी, गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईमध्ये दहशतवादी काम करताहेत. त्यातले काही जण पकडले जाताहेत. काही जण पकडले जात नाहीयेत. आणि इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे काढत असताना त्यांना कोल्हापूरला येण्यास मनाई करण्यात आली आहे. तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून परत पाठवू, सर्किट हाऊसमध्ये डिटेन करू, असे सांगितले जात आहे. म्हणजे येथील लोकशाही संपलीय. जे बोलायचे ते बोलायचे नाही. कशाच्या आधारे तुम्ही त्यांना डिटेन करणार आहात. ही दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.