भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचं रान उठवलं आहे. दरम्यान, आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबाग मध्ये असलेली ५ कोटी रूपयांची संपत्ती माहित असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नाही. मी स्वत: या प्रकरणाचा जाऊन तपास केला. महाराष्ट्रातील भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी बलदेवसिंग यांच्याकडे भाजपानं तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून आपली ही संपत्ती लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे," असं सोमय्या म्हणाले. तसंच बलदेवसिंग यांनी आम्हाला आमची तक्रार दिल्लीत निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यापूर्वी शिवसेनेकडून कारवाईचा इशाराकिरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतीमेला तडा जात असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी तयारी शिवसेनेने केली आहे. सोमय्या यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही असं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं, त्यासाठी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे असं एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. याबाबत एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनीही किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
"ही मंडळी बेफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते आणि माझ्या कुटुंबासोबत तेच केलं. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे," असा इशारा त्यांनी दिला.