शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी जप्त केली. यावरून माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोचक टोला लगावला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊतांवर ही कारवाई केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये प्रवीण राऊत व त्यांच्या निकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या काही भूखंडांचा समावेश आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर ही कारवाई झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला. 'हिसाब तो देना पडेगा', अशा शब्दांत सोमय्यांनी राऊतांना डिवचले. सोमय्या म्हणाले की, आज ईडीने पीएमएलए अंतर्गत पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणात संजय राऊतांचा भागीदार प्रवीण राऊत यांची ७३.६२ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. यापूर्वी या प्रकरणात प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांची ११.१५ कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. हिसाब तो देना पडेगा.
दरम्यान, पत्राचाळ भूखंड आणि त्यावरील एफएसआयच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी ९५ कोटी रुपये हे प्रवीण राऊत यांना मिळाले असून त्यांनी हे पैसे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि काही व्यावसायिकांच्या खात्यामधे फिरवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच यातील काही रक्कम ही वैयक्तिक खात्यात वळवली होती व याच पैशांतून ठाणे, रायगड, पालघर आणि दापोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केल्याचे तपासात दिसून आले. मे. प्रथमेश डेव्हलपर्स या राऊत यांच्या कंपनीने हा भूखंड खरेदी व्यवहार केला होता. नंतर ही जमीन बक्षीसपत्राद्वारे निकटवर्तीयांच्या नावे केल्याचे देखील ईडीच्या तपासात दिसून आले. या घोटाळ्यातील पैशांतून या मालमत्तांची खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले.