उल्हासनगर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यापासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. केवळ उत्तर प्रदेश नाही, तर मुंबई महाराष्ट्रातूनही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी यासंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. भाजपकडून राज ठाकरे यांना होणाऱ्या विरोधाबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा सोमय्या यांनी स्पष्टच उत्तर दिले.
उल्हासनगर येथे आले असताना किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपकडून विरोध होत असल्याबाबत किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, राम मंदिर अयोध्येचे असो की उल्हासनगरचे सर्वांना रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जण रामराज्य आणायचा प्रयत्न करतो
राम हा हिंदुस्थानातील असा देव आहे की, प्रत्येक जण रामराज्य आणायचा प्रयत्न करतो. मात्र, उद्धव ठाकरे रामभक्त हनुमान यांच्या हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात. तसेच राजद्रोहासाठी तुरुंगात टाकतात. आमचे स्पष्ट मत आहे की अयोध्येला रामाचे दर्शन करण्यासाठी ज्यांना जायचे असेल त्यांना दर्शन करायला मिळाले पाहिजे, असे सोमय्या म्हणाले. प्रभू श्रीरामांच्या शरणात जो जातो ते मंजूर आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी एक नेता अयोध्येला जात असताना लगेच आपल्या मुलाला अयोध्येला पाठवून दिले. त्याचवेळी त्याच रामाचा भक्त असलेल्या हनुमंतांची चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणून जेलमध्ये टाकतात, अशी टीका सोमय्या यांनी केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काय केले? रश्मी उद्धव ठाकरे यांचा १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, त्यावर काय केले? उद्धव ठाकरे यांच्या मेव्हुण्याची साडेसहा कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली, काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी द्यावीत, अशी विचारणाही सोमय्या यांनी केली.