मुंबई: मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी आज सकाळी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आणि त्यानंतर देवेंद्र यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आणि पत्रकार परिषदेत फडणवीसांचे ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मलिकांवर पलटवार केला आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले ?यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी आरोप केले. 'एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप करण्याची नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, हे केवळ ठाकरे-पवारच करू शकतात', अशी टीका किरीट सोमय्या यांनी केला.
तेव्हा गप्प का ?सोमय्या म्हणाले, नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून वानखेडेंवर आरोप करत आहेत. पण, वानखेडेंनी 2006 मध्ये मुस्लिम महिलेशी लग्न केलं. त्या आधी शेड्यूल कास्ट म्हणून ते नोकरीला लागले, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007 मध्ये आयआरएस म्हणून सिलेक्ट झाले, तेव्हा का गप्प बसला? 2015-16मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हाही तुम्ही का गप्प बसला होता? कधी वानखेडेचं नाव काढायचं, कधी अमृता फडणवीसांवर टीका करायची, ही काय नौटंकी आहे? असा हल्ला त्यांनी चढवला.
लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्नसोमय्या पुढे म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्धही झालंय. पण, त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीसांवर इतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणाले.
पवारांनी उत्तर द्यावंसोमय्या पुढे म्हणाले की, अजित पवारांनी एक हजार कोटींची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचं उत्तर ठाकरे-पवारांनी द्यावं. सहा फटक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावं, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. तसेच, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1992-93 मध्ये दंगलीच्या काळात भाषणं केली होती. त्यांची भाषणं ऐकली असती तर त्यांना कळलं असतं दाऊद आणि पवारांचे संबंध काय आहेत? असा चिमटाही सोमय्या यांनी लगावला.