Devendra Fadnavis on Madhukar Pichad Passed Away : भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पिचड यांचे शुक्रवारी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर पिचड यांनी मुलगा वैभव पिचड याच्यासह २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले...
आपल्या शोकसंदेशात ते म्हणाले की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली. मधुकर पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास ३५ वर्ष प्रतिनीधीत्व केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत नेहमीच मांडले. आदिवासी बहुल अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील ते नेहमी प्रयत्नशील राहिले. मी मुख्यमंत्री असताना काही महिन्यांपूर्वी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी भागातल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. आपल्या प्रकृतीची चिंता न करता मधुकरराव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यातून त्यांची आदिवासी बांधवाविषयीची तळमळ दिसून येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं- उपमुख्यमंत्री अजित पवार
मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या पिचड साहेबांनी पक्षासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.