Maharashtra Politics: मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. यानंतर महापालिका आयुक्तांनी सर्व पक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यानंतर आता भाजप नेत्याने शिवसेना ठाकरे गटाला डिवचले आहे. जे जे बाळासाहेबांचे आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, वाटीभर पक्षाने आता हट्ट सोडावा, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.
भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणार. जे बाळासाहेबाचे आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला त्यांनी हट्ट सोडला पाहिजे. जिथे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे एकनाथ शिंदेचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले जे कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.
वाटीभर असलेले शिवसैनिकच नाकात पाणी आणतील
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. हे वाटीभर असलेले शिवसैनिकच नाकात पाणी आणतील…, असा पलटवार दानवे यांनी केला आहे. तसेच पालिकेत झालेल्या राड्यावर बोलताना दानवे म्हणाले की, ती घटना हा दादागिरीचा प्रकार आहे. हीमस्ती सत्तेच्या जोरावर सुरू आहे. जनतेनेच ती उतरवली पाहिजे. शिंदे गटाला कार्यालय असणे वावगे नाही. त्यामुळे त्यांना हवे होते तर दुसरे कार्यालय बघायचे होते, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, भाजपासारखा अहंकार शिंदे गटाला चढला आहे. दुसऱ्याच्या घरात जाऊन सामान बाहेर फेकले तर कसे वाटेल तसेच आता ठाकरे गटालाही वाटत आहे. मात्र सध्या शिंदे गटाकडून अतिक्रमण केले जात आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"