Maharashtra Politics: “सावरकरांचा अपमान सहन न करणाऱ्या बाळासाहेबांचा नातू राहुल गांधीची गळाभेट घेतोय, हे दुर्दैव”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:52 PM2022-11-17T15:52:22+5:302022-11-17T15:53:10+5:30
Maharashtra News: भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. यावरून आता राहुल गांधींवर हल्लाबोल केला जात आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधी यांची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) भाजपने निशाणा साधला आहे.
भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का? स्वातंत्रवीर सावरकरांचे बलिदान, त्याग, संघर्ष, त्यांना झालेल्या यातना याबद्दल तुम्ही कधी वाचले आहे का?, ‘भारत जोडो’ यात्रेला देशाने नाकारले. त्यामुळे बातम्यांमध्ये झळकण्यासाठी एका महान क्रांतीकाराबद्दल तुम्ही असे अपशब्द वापरणार का, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे.
ही कशी विचारसरणी आहे?
राम कदम यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत घेतलेल्या सहभागावरून टीकास्त्र सोडले आहे. सर्वात दुर्देवाची बाब ही आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही कधी सावरकरांचा अपमान सहन केला नाही. त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सावरकारांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेत आहेत. ही कशी विचारसरणी आहे, असा सवाल करत, भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, या शब्दांत राम कदम यांनी हल्लाबोल केला. तसेच येणाऱ्या काळात तुम्ही सावरकरांबद्दल अपमान करणाऱ्या शब्दांचा वापर केला आणि सावरकरांच्या भक्तांना चिथावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या यात्रेचे स्वागत आम्हाला वेगळ्या पद्धतीने करावे लागेल, असा इशाराही राम कदम यांनी दिला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे देशासाठीचे योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"