Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून राहुल गांधींवर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणी भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. यातच आणखी एका नेत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही. राहुल गांधी काँग्रेसचे लोढणे असल्याची बोचरी टीका करण्यात आली आहे.
भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे ते वक्तव्यच नाही. राहुल गांधींना या देशाचा इतिहास माहिती नाही. राहुल गांधींना या देशाचा भूगोल माहिती नाही. देशाच्या स्वातंत्र्याची जी मोठी चळवळ उभी राहिली, त्याबाबत राहुल गांधींचा थोडाही अभ्यास नाही. राहुल गांधी शंभर टक्के पप्पू आहे. राहुल गांधी काँग्रेसची लायबिलिटी आहे. म्हणूनच राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा वारंवार अपमान करतात. यासाठी केवळ महाराष्ट्र नाही, तर देशातील जनता राहुल गांधींना गांभिर्याने घेत नाहीत आणि अशा विधानांसाठी त्यांना माफही करणार नाही, या शब्दांत भाजप नेते सागर यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली.
महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते
या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी देशाचा अपमान केला आहे. सावरकरांबद्दल त्यांचे हे वक्तव्य कुणीही सहन करू शकणार नाही. भाजप याचा तीव्र निषेध करणार आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींवर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"