मुंबई: देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रातही विधान परिषद निवडणूक सुरू आहे. सायंकाळी ४ वाजता सर्वच्या सर्व आमदारांनी आपले मत टाकले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. भाजप नेत्यांकडून एक ट्विट करण्यात आले असून, गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चालवले मात्र, आज त्यांच्या रिपोर्ट कार्डचा दिवस आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्व २८५ आमदारांचे मतदान झाले आहे. सरकारमध्ये राहण्यासाठी १४३ ही मॅजिक फिगर आहे. या महाविकास आघाडी सरकारला २.५ वर्षे चालवल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला किती मते मिळतात ते पाहूया! उद्धव ठाकरे यांच्या हे रिपोर्ट कार्ड असेल! असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.
नवाब मलिक, अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टानेही परवानगी नाकारली
हायकोर्टाने मलिक-देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर दोघांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दुपारी २ वाजता ही सुनावणी सुरू झाली. तेव्हा जर मतदानाची परवानगी दिली तर मतदान करू शकता का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या वकिलांना विचारणा केली. मात्र हायकोर्टाने उशीरा निकाल पत्र दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात येण्यास उशीरा झाला असं सांगण्यात आले. परंतु या प्रकरणावर तातडीने निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत मतदानाला परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, महाविकास आघाडीची बिघाडी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मतांचे परिवर्तन भाजपाकडे झाले आहे. अपक्षांची मदत आणि काही मविआ आमदारांची साथ यामुळे भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून येईल. या निकालाचा परिणाम पाहून मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.