मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. दोघांकडूनही एकमेकांना दिवाळीनंतर फटाके फोडण्याचे इशारे दिले जात आहेत. त्यातच एकीकडे नवाब मलिक यांनी रविवार मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले असतानाच आज भाजपा नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या मुलाचे यांचे ड्रग्स पेडलर, २६/११ मधील आरोपी, सीबीआय, ईडी यांचे आरोपी यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मोहित कंबोज म्हणाले की, फुलबाजा त्यांनी लावले आहेत. आता फटाके फुटणारच आहेत. आम्हीही फटाके फोडणार आहोत. आमचे देवेंद्र फडणवीसही फटाके फोडणार आहेत. आता देवेंद्र फडणवीस असा फटाका फोडतील की, त्याचे उत्तर देणे नवाब मलिक यांना जड जाणार आहे. त्याचे उत्तर देण्याऐवजी ते पळ काढतील.
कंबोज पुढे म्हणाले की,मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, सीबीआयचा आरोपी असलेल्या एका व्यक्तीसोबत यांच्या मुलाची भागीदारी आहे. यांनी बँकेमध्ये १३५ कोटींचा फ्रॉड करून तो पैसा आपल्या मुलाच्या कंपनीत आणून गुंतवला. त्यामधून यांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची खरेदी केली. मलिक यांनी वांद्रे येथे २० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ईडीचा आरोपी असलेल्या, झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये मुंबईत झालेल्या घोटाळ्यात नाव आलेल्या व्यक्तीकडून यांनी यावर्षी एक प्रॉपर्टी खरेदी केली. तसेच २०११ मध्ये मोक्काचा आरोपी असलेल्या, २६/११ प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता ज्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते, अशा व्यक्तीसोबत नवाब मलिक यांच्या मुलाने एक मालमत्ता अगदी कमी किमतीत खरेदी केली होती, असा आरोपही मलिक यांनी केला.
महाराष्ट्रातील एक मंत्री ज्याचे ड्रग्स पेडलर्सशी संबंध आहेत, सीबीआयच्या आरोपींशीही संबंध आहेत आणि ईडीच्या आरोपींशी संबध आहेत. २६/११ च्या आरोपींशी संबंध आहे. अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का. डाळीत काळं आहे. आता खोटे आऱोप करणे, खोट्या गोष्टी बोलणे या गोष्टी मानसिक संतुलन बिघडलेला व्यक्तीच करू शकतो, असा टोलाही मोहित कंबोज यांनी लगावला.