BJP Murlidhar Mohol ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचेही नाव अनपेक्षितरीत्या चर्चेत आले होते. मात्र आता स्वत: मोहोळ यांनी ही चर्चा खोडून काढत स्पष्टीकरण दिलं आहे. "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे," असं मोहोळ यांनी 'एक्स'वरील पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेविषयी पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लामेंट्री बोर्डात एकमताने घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लामेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे," असा खुलासा मोहोळ यांनी केला आहे.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवल्याचं सांगत अप्रत्यक्षरीत्या तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं सुचवल्याचं दिसत आहे.
मुरलीधर मोहोळ यांचे नाव का होते चर्चेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजप अनपेक्षित निर्णयांसह धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. महाराष्ट्रातही तोच पॅटर्न अवलंबला गेल्यास मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण नेत्याचा विचार होऊ शकतो. पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील आहे. तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. यंदा पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मोहोल यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा रंगत होती.