मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं. मात्र त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केली. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांवर बरसणारे उद्धव ठाकरे आता त्याच पवारांचं तोंडभरून कौतुक करत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे शरद पवारांबद्दल काय बोलायचे, असा प्रश्न विचारत राणेंनी ठाकरेंची जुनी विधानं वाचून दाखवली. 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी शरद पवारांना लाथ मारून पक्षाबाहेर काढले. मात्र त्यानंतरही सत्तेसाठी पवार लाचारीनं त्यांच्याकडे गेले. त्यांच्यासारखा लाचार नेता मी कधीही पाहिला नाही. शरद पवार कुडमुडे ज्योतिषी आहेत. नशीब महाभारतात पवार नव्हते. अन्यथा त्यांनी तिथेही फोडाफोडी केली असती. अजित पवारांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू, अशी टीका उद्धव ठाकरेंनी याआधी केली आहे. मात्र क्षमता नसतानाही पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. त्यामुळेत आता ते पवारांचे गोडवे गात आहेत,' अशी टीका राणेंनी केली.
डेलकर यांची निशाणा; राणेंचा निशाणादादरा नगर हवेलीत भाजप उमेदवार पराभूत झाल्यानंतर शिवसेनेनं जल्लोष केला. त्यावरूनही राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. 'दादरा नगर हवेतील अपक्ष उमेदवार कलाबेन डेलकर निवडून आल्या. त्यांचे पती मोहन डेलकर तिथून ७ वेळा विजयी झाले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी कलाबेन निवडून आल्या. त्या अपक्ष आहेत. त्यांची निशाणी फलंदाज होती. धनुष्यबाण नव्हती. त्यामुळे शिवसेनेनं जल्लोष करण्यासारखं काही नाही. दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेची सवय आहे. दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखसुद्धा नाही', असा टोला राणेंनी लगावला.
''आता १८ आहेत, पुढल्या वेळी ८ पण नसतील'''शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींमुळे यश मिळालं. मोदींचा चेहरा होता म्हणून लोकसभेला १८ आणि विधानसभेला ५६ जागा मिळाल्या. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं गद्दारी केली. आता पुढील निवडणुकीत शिवसेनेचे ८ उमेदवारदेखील निवडून येणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत त्यांचे २५ उमेदवारही जिंकून येणार नाहीत,' असं राणे म्हणाले.