जामनेर: महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. यात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे. अलीकडेच एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला. यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे. जलील यांच्या प्रस्तावानंतर राज्यात राजकारणाची नवी समीकरणे जुळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. यातच शिवसेनेकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.
एमआयएमने दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत महाविकास आघाडीतील मोठा आणि महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून लावत भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही इम्तियाज जलील यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी टीका केली आहे.
शिवसेना दिशाहिन पक्ष, तत्त्व अन् धोरण नाही
दोन वर्षांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली आणि या अभियानाला उशीर झाला, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावर बोलताना, शिवसेनेला तत्व किंवा धोरण नाही. शिवसेना म्हणजे दिशाहिन पक्ष असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी नारायण राणे जामनेर येथे आले होते.
दरम्यान, शिवसेनेचे हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. भाजपचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना सांगितले.