मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अनुल्लेखाने टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच टीकेवर आता नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. (bjp leader narayan rane reacts uddhav thackeray on medical college in konkan)
मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करू शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की नाही, याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हांला शब्द देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावेळी बोलताना केलेल्या टीकेचा नारायण राणे यांनी एक ट्विट करून समाचार घेतला आहे.
तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण फक्त स्वतःचा विचार करतात; उद्धव ठाकरेंचा राणेंवर 'प्रहार'
नारायण राणे यांनी केला पलटवार
मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी, या शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असतात. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.