चिपळूण - गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पवसाचा मोठा फटका बसला आहे. कोकणातील महाड आणि चिपळूणला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूण भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, आपण चिपळूण पुन्हा उभे करून दाखवू, असा दिलासाही व्यापाऱ्यांना दिला. मात्र, आता भाजप नेते तथा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दौऱ्यासंदर्भात मोठे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री चिपळूणला चौथ्या दिवशी का पोहोचले? यामागचे 'फॅक्स'कारण' त्यानी सांगितले आहे.
आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज चिपळूण येथे येऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यावरील संकटं मुख्यमंत्र्यांचा पायगूण; पाय बघायला पाहिजे...; नारायण राणेंचा हल्लाबोल
...म्हणून मुख्यमंत्री चौथ्या दिवशी पोहोचले चिपळूणला - मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यासंदर्भात बोलताना राणे म्हणाले, "काल साडे सहाला माझा फॅक्स आला. की आम्ही चिपळूण आणि रायगडची पाहणी करण्यासाठी येत आहोत. त्यानंतर त्यांनी (मुख्यमंत्र्यांनी) हा कार्यक्रम आखला. मातोश्रीचा दरवाजा तेव्हा उघडला. बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी डिस्चार्ज केला. ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? थोडी तरी आहे का? हे झाल्या झाल्या पाहायला यायला पाहिजे होतं. हेलिकॉप्टर मिळत नाही? उभं राहून बंदोबस्त करायला हवा होता. या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला हवं होतं. सर्व व्यवस्था करायला हवी होती. जी आता भाजपकडून सुरू आहे. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री? या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे," अशी घणाघाती टीकाही राणे यांनी यावेळी केली.
राज्यावरील संकटांना मुख्यमंत्र्यांचा पायगूण कारणीभूत -राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे, तसेच, ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का? असा खोटक टोलाही राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी लगावला.
...मुख्यमंत्री काय पाहुणे आहेत का? -यावेळी केंद्रिय मंत्री नारायण राणे प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही भडकले. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते येथे आलो आहोत. मात्र, प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम माहीत नाही. एकही अधिकारी आम्हाला भेटण्यासाठी आला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि इतर अधिकारीही कार्यालयात बसून होते. पण ते आले नाही. हा बेजबाबदारपणा आहे. यासंदर्भात आपण राज्याच्या मुख्यसचिवांकडे तसेच केंद्राकडे तक्रार करणार आहोत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही राणे यावेळी म्हणाले. याच वेळी, हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना सोडण्यासाठी गेले. ते काय पाहुणे आहेत काय? असा सवाल करत, येऊन पाहणे त्यांचे कामच आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.