रत्नागिरी : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर विशेषतः कोकणातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेली टीका राणे समर्थकांना बरीच लागलेली दिसतेय. कारण आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराचा राणे समर्थकांनी राऊतांना दिला आहे. (bjp leader narayan rane supporters warns shiv sena mp vinayak raut)
राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल. बुडत्याला काडीचा आधार, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. यावरुन राणे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. एवढेच नव्हे, तर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी विनायक राऊत यांना दिला आहे.
विनायक राऊत, भाषा बदलली नाहीत तर...; राणे नॉन मॅट्रिकवरून निलेश राणे संतापले
भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे, असेही विनायक राऊत म्हणाले होते.
नारायण राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने विरोध केला नाही. याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्यात आली. राणेंच्या कंगालपणामुळे प्रस्ताव रखडला होता, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.
दरम्यान, नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांना प्रत्यूत्तर दिले. भाजपाच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की, काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल, आता नवीन थापा झालाय, असा जोरदार पलटवार निलेश राणे यांनी केला.