मुंबई - राज्यातील ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh), यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापे टाकले. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. यातच, आजपर्यंत या देशात एजन्सीजचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही, भाजपकडून एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर, भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी "करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (BJP leader Narayan Rane targets NCP over ED's action against Anil Deshmukh)
नारायण राणे म्हणाले, "ही कायदेशीर कारवाई आहे, राजकीय नाही. जसं मराठीत म्हण आहे, करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे. जे केलं त्याची चौकशी सुरू आहे. यामुळे यात कुणी राजकारण करू नये, राष्ट्रवादी काँग्रेसने तर करूच नये, आता हे सिद्ध होऊ द्या बाहेर येऊ द्या, मग बघू काय आहे ते.
खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत -आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा - मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य दुमजली बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. त्या जागेची किंमत आताच्या घडीला १० कोटी आहे. या कामाला बहुतेक पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरे यांचा गाइडन्स आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी करावी. अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओही दाखवला. यामध्ये एका बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप
एजन्सीजचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन -सुळे म्हणाल्या, "राजकारण हे विचारांचं असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं.आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही, ऐकलेला नाही. एजन्सीजचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण नोटीस आली होती,अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात अस राजकारण कधी होत नाही,महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकाना त्रास देण्याकरता केला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणता ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं आहे हे दिसते आहे"