Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गट यावरून आक्रमक झाला आहे. अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच एका भाजप नेत्याने याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना, अजित पवारांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवे, असे म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली. धर्माकरीता त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच त्यांना जगात धर्मवीर म्हणून मान्यता आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी महाराजांची जगात ओळख आहे. अजितदादांनी जे विधान केले, त्याबद्दल खरेतर त्यांची रवानगी पाकिस्तानमध्ये केली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
रोहित पवारांचे दिले प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तुम्ही शब्दांशी खेळत बसू नका. त्यामागची भावना समजून घ्या. राज्यपालांनी आणि भाजपच्या प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. तेव्हा तुम्ही शांत का होता? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली. तत्पूर्वी, विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले.
दरम्यान, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"