सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच एक मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यात लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. (bjp leader nitesh rane criticises on uddhav thackeray government over corona infection)
गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे फिरत होते. आतापर्यंत त्यांना कधीही कोरोना झाला नाही. अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच त्यांना कोरोना झाला. छगन भुजबळांनाही नेमका सकाळीच झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
"संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी"
भाजपच्या प्रश्नांना उत्तरे नाहीत
एक मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येत आहेत. राज्यभर फिरणाऱ्या मंत्र्यांना आठ दिवसांमध्ये झालेला हा कोरोना खरा आहे की, हा राजकीय कोरोना आहे? आगामी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे. WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, असा चिमटाही नितेश राणे यांनी काढला.
हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला
आता वेगळ्या प्रकारचा सामना वाचायला मिळतोय. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचलाय.उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय. हिंदूंना विरोध केला जातो. हिंदूंच्या सणांना विरोध केला जातोय. हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे, या शब्दांत नितेश राणे यांनी सामनावर टीका केली.