Maharashtra Politics: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर असून, केंद्रीय मंत्र्यांसह पक्षातील पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेतेही विविध ठिकाणचे दौरे करत आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यातच भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर जहरी टीका केली असून, एकेरी उल्लेख करत २०२४ च्या निवडणुकीत आपटून टाकू, या शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.
भाजप नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख करत घणाघाती टीका केली आहे. कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. त्याला २०२४ ला आपटून टाकू. एवढा काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, असा हल्लाबोल नीतेश राणे यांनी केला. एका जाहीर कार्यक्रमात नीतेश राणे बोलत होते.
अमोल कोल्हे लिहून देतो आणि अजित पवार वाचतात
अजित दादा यांना अमोल कोल्हे लिहून देतो आणि ते वाचून दाखवतात. धर्मवीर नावाची पदवी त्यांना पुसून टाकायची आहे, अशी टीकाही राणे यांनी केली. दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यांवरून वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या एका विधानावरून भाजप आणि शिंदे गट चांगलेच आक्रमक झाले होते. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अजित पवार यांनी नीतेश राणे यांच्यावर टीका करताना उंचीचा उल्लेख करत खिल्ली उडवली होती.
दरम्यान, नीतेश राणे यांनी यावर पलटवार करत अजित पवार यांना धरणवीर असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. अमोल कोल्हे यांनीही अजित पवार यांच्या बचावासाठी एक व्हिडिओ जारी करत काही ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख केला होता. याला लेखक विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उत्तर दिले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"