सिंधुदुर्ग : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam) गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. यातच आता भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. (bjp leader nitesh rane slams maha vikas aghadi govt over mpsc exam)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा पुढे ढकलायची होती, तर मग हॉलतिकिटे कशाला काढली? विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान सरकार भरून देणार का?, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. राज्य सरकारने याची नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा
राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास
जेव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो. विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे राज्यातील जनतेला नुसता त्रास झाला आहे, अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केली.
सचिन वाझेंना अटक झालीच पाहिजे
अँटिलियाच्या बाहेर नेमके काय झाले, हे आपल्याला खरेच जाणून घ्यायचे असेल, तर सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे. हे प्रकरण अतिरेकी प्रकरण आहे की, खंडणीचा विषय आहे हे बाहेर यायला हवे, असे नितेश राणे यांनी सांगितले.
२१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण
परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच नवीन जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच २१ मार्च रोजी परीक्षा झाली नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.