भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या कारमध्ये 6 एअरबॅग्ज असाव्यात यावर जोर देत आहेत. त्यांनी नुकताच रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला होता, मात्र, आता या व्हिडिओचा संबंध हुंडा प्रथेशी जोडला जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेला अभिनेता अश्रय कुमारही राजकारणी आणि सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आहे.
काय आहे प्रकरण - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 6 एअरबॅग्जला प्रोत्साहन देण्याठी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला होता. याबरोबर त्यांनी, '6 एअरबॅग असलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करा आणि आपले जीवन सुरक्षित करा', असेही लिहिले होते. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारही दिसत आहे. मत्र, आता या व्हिडिओवरून राजकारण सुरू झाले आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने हुंडा प्रथेचा प्रचार केला जात असल्याचे यूजर्स म्हणत आहेत. भारतात हुंडा घेणे अथवा देणे हा गुन्हा आहे.
व्हिडिओमध्ये काय? - या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आपल्या मुलीला लग्नानंतर निरोप देताना दिसत आहेत. यावेळी त्या मुलीचे वडील रडत असतात. तेवढ्यात अक्षय कुमार तेथे येतो आणि त्यांना जावई तसेच मुलीच्या सुरक्षिततेबद्दल अलर्ट करतो. यावेळी अक्षय म्हणतो, 'अशा गाडीतून मुलीला निरोप द्याल तर रडायला येणारचना. यावर तिचे वडील गाडीची वैशिष्ट्ये सांगायला लागतात. यातच अक्षय कुमार 6 एअरबॅग्जबद्दल विचारतो आणि नंतर ती कार बदलली जाते.
गडकरी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवरून शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी, 'या जाहिरातीत समस्या असल्याचे म्हणज, असे क्रिएटिव्ह कोण पास करतं? असा प्रश्न विचारला आहे. एवढेच नाही, तर सरकार सुरक्षिततेला चालना देण्यासाठी पैसे करर्च करत आहे, की हुंडा प्रथेला चालना देत आहे,' असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, भारत सरकारकडे अधिकृतरित्या हुंडा प्रथेला प्रोत्साहन देताना पाहणे वाईट आहे, असे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखले यांनी म्हटले आहे.