Dhananjay Munde: भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:22 PM2022-04-13T12:22:50+5:302022-04-13T12:51:15+5:30
Dhananjay Munde: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंगळवारी रात्री अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगण्यात येत होते, पण नंतर भोवळ आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भाऊ रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच पंकजा (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडेंनी(Pritam Munde) तातडीने रुग्णालयात जाऊन भावाच्या तब्येतीची विचारपूस केली.
भोवळ येऊन बेशुद्ध पडले-अजित पवार
काल(मंगळवारी) धनंजय मुंडे Dhananjay Munde जनता दरबारात उपस्थित होते, त्यानंतर ते शरद पवारांना भेटण्यासाठी गेले. यादरम्यान अचानक भोवळ येऊन ते बेशुद्ध पडले. सुरुवातीला त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगण्यात येत होते. पण, अजित पवारांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांना भोवळ आल्याचे स्पष्ट केले. “काल पक्ष कार्यालयात आणि पवारांकडे असताना त्यांना भोवळ आली. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे,” असं अजित पवारांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
सुप्रिया सुळेही धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. “गेल्या काही दिवसांत त्यांचा फार प्रवास झाला; उष्णता आणि दौरा यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. पण डॉक्टरच याविषयी जास्त सांगू शकतील. मी धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. ते सध्या चांगल्या स्थितीत असून ते जास्त महत्वाचं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.