जिंतूर ( जि. परभणी ): तोडपाणी करणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार होऊच शकत नाहीत, अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे आयोजित जाहीर सभेत नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली. परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुंडे बोलत होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ब्रिटिशांनी माणसां-माणसांमध्ये भेद निर्माण करुन राज्य केले. तसे काँग्रेस- राष्ट्रवादीसारखे पक्ष करु पाहत आहेत. त्यांच्याकडून द्वेषाचे राजकारण केले जात असून आमच्याही कुटुंबात राष्ट्रवादीने भांडणे लावली. हे तर उदाहरण जगासमोर आहे. ज्या मातीत त्या लोकांचा विकास करण्याऐवजी स्वत:चे घर भरण्याचे काम राष्ट्रवादीने केले. व्यापारी, कंत्राटदार, मंत्री, अधिकारी यांच्या तक्रारी करुन त्यांच्या लक्षवेधी लावायच्या आणि मागच्या दाराने तोडपाणी करायचे, हा उद्योग या पक्षांच्या नेत्यांचा आहे. त्यामुळे तोडपाणी करणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारस होऊच शकत नाहीत, अशी टीका पंकजा यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली.तोडपाणी करणाऱ्या नेत्यांना हद्दपार करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छ भारत अभियान या सारख्या जनहिताच्या योजना राबवून देशाची वेगळी ओळख निर्माण केली. ७० वर्षात जे काँग्रेसला जमले नाही, ते पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी करुन दाखविले. शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार खा. संजय जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, तालुकाप्रमुख राम शर्मा, अॅड. प्रताप बांगर, मेघना बोर्डीकर, सुरेश नागरे आदींची उपस्थिती होती.
तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊच शकत नाहीत-पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 9:40 PM