राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. दसरा मेळावा आणि त्यानंतर सत्ताधारी तसंच विरोधक यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
शनिवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अनेक वक्तव्यांवर भाष्य केलं. तसंच त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणाऱ्या त्या एवढ्या मोठ्या नेत्या नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना त्यांच्या बोलण्यानं आपण लहान होत नाही आणि मोठीही होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठीकाला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"मी शरद पवार यांचं वक्तव्य ऐकलं नाही परंतु मोबाईलवर पाहिलं. ते जे बोलले ते खरं आहे. मी मोठी नेता नाही. मी लहान आहे आणि मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे आणि प्रोत्साहनही दिलं पाहिजे. पण त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मी लहान होत नाही आणि मोठीही. मी तेवढीच राहणार आहे. ते आमच्यापेक्षा मोठे नेते आहेत यात काही वादच नाही," असंही त्या म्हणाल्या.