कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं : प्रसाद लाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:33 PM2020-02-25T16:33:08+5:302020-02-25T16:34:02+5:30
महाविकास आघाडीच्या सरकारकडून सूडबुद्धीचे राजकरण केले जात असल्याचा आरोपही लाड यांनी केला.
मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून देण्यात आलेल्या घोषणा पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला होता. त्यावरून भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले असून, अजित पवारांना कदाचित पुन्हा आमच्याबरोबर यायचं असेल, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
लाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून, सरकारने कितीही प्रयत्न केले तरही आंदोलने होणारच. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारकडून सूडबुद्धीचे राजकरण केले जात असल्याचा आरोपही लाड यांनी केला.
तर अजित पवारांवर निशाणा साधताना लाड म्हणाले की, कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं असेल, त्यामुळे ते मागचे दिवस आठवले असल्याचे म्हणत आहे. तर शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे अजूनही पैसे गेले नसून, शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.