Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकार कोसळणार असल्याचे दावा केला आहे. चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. २०२४ ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया येत असून, भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झाल्याची टीका दरेकरांनी केली आहे.
संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळलेला दिसत आहे. १०० टक्के वैफल्यग्रस्त झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. हमरीतुमरीवर येणे म्हणजे संजय राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचे दिसत आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचा कारभार आधीच आदित्य ठाकरेंकडे गेला आहे. संजय राऊतांच्या हातात काहीच राहिलेले नाही, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत
महाविकास आघाडीचे सरकार असतानाच शिवसेनेचा कारभार आदित्य ठाकरेंकडे गेला होता. संजय राऊत यांच्या हातात आता काहीही राहिलेले नाही. नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. मात्र, तेच बैठकांवेळी बाहेर असायचे. विभागाचा कारभार आदित्य ठाकरे चालवायचे, असे सांगत आता ठाकरे गटाकडे अशी किती शिवसेना शिल्लक आहे. तळागाळात, ग्राऊंडवर जाऊन काम करणारे किती जण शिवसेनेत आहेत, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच आमच्याकडे, ओसाड गावचा पाटील करणे, असे म्हटले जाते. तसेच संजय राऊत हे आदित्य ठाकरे यांना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत, असा खोचक टोला प्रवीण दरेकरांनी लगावला.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गिरे तो भी टांग उपर!, असे अजित पवारांचे झाले आहे. विधान चुकल्यानंतर, विरोध झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती.पण अजित पवार यांचा अहंकार असा आहे की आम्ही सगळ्यांच्यावर आहोत! तो अहंकार त्यांच्यातून जायला तयार नाही, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"