पिंपरी: प्रत्येकाला जगण्याची चिंता आहे. लोकांच्या जिवीताचे रक्षण करण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी कोविडवर फोकस करावा. बुलेट ट्रेन नागपुरलाही नेऊ, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.खेड तालुक्यातील चाकण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्या पीडित कुटुंबाची दरेकर यांनी रविवारी (दि. २६) भेट घेतली. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने त्यांच्याकडे केली. त्यानंतर दरेकर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेतली. देशात कायद्याचे राज्य आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली. आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी या वेळी उपस्थित होते. राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्याच हाती आहे, इतर दोन पक्ष मागे बसले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हणाले. त्यावर दरेकर म्हणाले, सरकारची गाडी किती चाकी आहे, पुढे व मागे कोण बसलंय, गाडी खड्ड्यात आहे की बाजूला जातेय यापेक्षा कोविडचा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन कोविडच्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. जातीने लक्ष देऊन उपाययोजना केली पाहिजे. वेळेत नियोजन झाले नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.नागपूरला बुलेट ट्रेनने जोडले असते, तर मला अधिक आनंद झाला असता, असे मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हणाले. याबाबत दरेकर म्हणाले, आपल्या जिवीताचे रक्षण करणे, याच गोष्टीला आजच्या घडीला प्राधान्य आहे. जगलो तर सर्वकाही करता येईल. त्यामुळे जगण्यासाठी आधी कोविडवर लक्ष केंद्रीय करायला हवे. बुलेट ट्रेन आणायला वेळ आहे. ती आपण नागपूरलाही नेऊ. नागपूर महामार्ग होतोच आहे. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणी करण्याची ही वेळ नाही, याचे सरकार म्हणून भान ठेवले पाहिजे.’’
तुम्ही फक्त कोरोनावर लक्ष केंद्रीत करा; बुलेट ट्रेन नागपूरलाही नेऊ; भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 5:30 PM