मुंबई – राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मोठ्या राजकीय हालचाली घडतायेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली, या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला गेले आणि आता त्याठिकाणी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतायेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी भाजपानं अजितदादांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार अशा शब्दात सावध भूमिका घेतली आहे.
भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, आता चर्चा काही रंगू शकते, चर्चा काहीही असू शकते. अजित पवार आणि शरद पवार यांनाच माहिती असेल ते दिल्लीला का जातायेत आणि कशासाठी जातायेत. दिवाळी आहे, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दिवाळीच्या शुभेच्छांसाठी ते भेटू शकतात. राजकीय भेट किंवा उद्देशही असू शकतो. आता त्यांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार? अशी सावध भूमिका त्यांनी घेतली.
त्याचसोबत अनेक गोष्टी कौटुंबिक भेट झाल्यावर घडलेल्या आहेत आणि बिघडलेल्याही आहेत. त्यामुळे या भेटीनंतर काय होईल हे तेच सांगू शकतात. शरद पवारांना विचारा, दिलीप वळसे पाटील यांना विचारा, शरद पवार आले तर १०० टक्के स्वागत आहे. पहिले शरद पवार येणारच होते, परंतु मध्येच कुठे गाडी थांबली माहिती नाही. अजितदादांनीही त्यावर भाष्य केलेले आहे असं भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दिल्लीत पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही होते. संध्याकाळी अजित पवार गट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचला. शाह आणि अजितदादा यांच्या भेटीमागे नेमके काय कारण आहे हे अद्याप कळले नसले तरी या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार हे नक्की, विशेष म्हणजे दिवाळी कार्यक्रमानिमित्त आज बऱ्याच दिवसांनी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली, अजितदादांना डेंग्यू झाल्याने मागील काही दिवस ते सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून लांब होते, अशावेळी शरद पवारांसोबत कौटुंबिक भेट आणि त्यानंतर तातडीने अजितदादा दिल्लीला रवाना झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.