Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. अभद्र भाषेत अब्दुल सत्तार यांनी विधान केले. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात माफी मागितली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही आक्रमक भूमिका मांडत आहेत. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना, ते मुद्दामहून किंवा जाणीवपूर्वक असे करत नसल्याचे म्हटले आहे.
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अब्दुल सत्तार यांचा मूळ स्वभाव सांगितला. सत्तार हे माझे जवळचे मित्र आहे त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे, त्यांना मागेही सांगितलं होतं पण ते जाणीवपूर्वक करतात असे नाही. मुद्दाम करतात असे नाही त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. यापूर्वी सल्ला दिला होता आत्ताही सांगेन की, आपण आता राज्यकर्ते आहोत. जपून बोलले पाहिजे, जो काही प्रकार घडला होता, तो योग्य नव्हता असे आता अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारे याचे समर्थन होऊ शकत नाही
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असून ते योग्य नसल्याचे म्हटले आहे. हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते. परंतु, कायदा हातात घेणे हे सवंग लोकप्रियतेसाठी केले आहे. सत्ता गेल्याचे वैफल्यच यातून दिसते, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
दरम्यान, भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. कोणीही महिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध व्हायला हवा. परंतु संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना असे शब्द वापरण्याची सुट दिली होती का, तमाम निषेध गॅंगने???, अशी विचारणा करत, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"