Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आल्याचे दिसत आहे. भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटातून नेमक्या कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारात जवळपास निश्चित झाले आहे.
यावर प्रतिक्रिया देताताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. राज्यात मागच्या काही वर्षात अडचणी निर्माण झाल्या होत्या. येत्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पुर्ण करु. आम्ही चांगली कामगिरी करु, असा विश्वास विखे-पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आत्तापर्यंत सक्षम पद्धतीने काम केले आहे
राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र आणि भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. साहेबांनी आत्तापर्यंत सक्षम पद्धतीने काम केले आहे. आनंदच आहे. सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरु आहे. राज्यात अधिक कामाचा व्याप आहे. मला सरकारवरती पूर्ण विश्वास आहे, असे सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण यांची तर शिंदे गटाकूडन उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.