Ram Shinde Ajit Pawar Mahayuti : दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीतीसंगमावरील यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांची त्यांच्याशी भेट झाली. भेट होताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले असता. त्यावेळी 'थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर कळलं असतं', असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते राम शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे.
माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, "राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे मीडियामध्ये विधान आलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडच्या संदर्भात माझ्याविरोधात एक कट रचला गेला होता. त्याचा मी बळी ठरलो. त्याचा आज प्रत्यय आलेला आहे."
याचा अर्थ हा नियोजित कट होता -राम शिंदे
"वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भात वरिष्ठांकडे, पक्षाकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो. परंतू आज स्वतःच अजित पवारांनी सांगितलं की, मी सभेला आलो असतो, तर तुझं काय झालं असतं? याचा अर्थ हा नियोजित कट होता. त्यात माझा बळी गेला. या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे", असा आरोप राम शिंदे यांनी अजित पवारांवर केला.
आता राम शिंदेंची मागणी काय?
"मला वरिष्ठांकडे तक्रार करण्यासंदर्भात, महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यासंदर्भातच असा प्रश्न उपस्थित होत असेल, तर हे महायुतीसाठी चांगलं नाही. माझ्यासाठी तर नाहीच नाही. पण, गांभीर्याने दखल घेऊन आमच्या वरिष्ठांनी विचार विनिमय केला पाहिजे. ही माझी अपेक्षा आहे", अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे.
प्रीती संगमावर काय घडलं?
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते.
आमदार रोहित पवार हेही त्यांच्यासोबत होते. शरद पवार व रोहित पवार यांनी अभिवादन केल्यानंतर शरद पवार येथून मार्गस्थ झाले. तर रोहित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल झाले.
रोहित पवार प्रीतीसंगमाहून बाहेर पडत असताना अजित पवार आत येत होते. दोघे समोरासमोर येताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले. त्यावेळी निवडून आल्याबद्दल अजितदादांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच 'थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर तुला कळलं असतं', असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला. त्यांच्या या वाक्यानंतर दोघेही दिलखुलास हसले.