अतुल कुलकर्णी, मुंबईदुष्काळावरील चर्चेत सरकार व विरोधक; दोघांनाही बोलायचे आहे, त्यामुळे दुष्काळाशी संबंधित प्रस्ताव विधानसभेत अध्यक्षांनी तर विधानपरिषदेत सभापतींनी मांडावा, अशी सूचना करत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सरकार आणि विरोधक अशा दोघांचीही राजकीय कोंडी करून टाकली. शिवाय, आम्हालाही दुष्काळावर बोलायचे आहे. आमच्या पक्षाने यासाठी काय केले हे सांगायचे आहे, असे म्हणत दुष्काळावर शिवसेना वेगळी चूल मांडेल, असे संकेतही रावते यांनी दिले.अधिवेशनात दुष्काळावरील चर्चेचा किती सुकाळ होईल, याचीही चुणूक या निमित्ताने पाहायला मिळाली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सभापती रामराजे निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहांतील सर्वपक्षीय नेत्यांची एकत्रित बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, परिवहनमंत्री दिवाकर रावते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे धनंजय मुंडे, अजित पवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती. वास्तविक, राज्यात अशा बैठकीची प्रथा नाही. मात्र, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे सभापतींनी पुढाकार घेत, ही बैठक घडवून आणली. त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकताना विरोधकांना जे काही सरकारला सांगायचे होते, ते विरोधकांनी या बैठकीत सांगून टाकले. अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांचे अभिभाषण होत असते. राज्यपालांच्या आगमन आणि प्रस्थान अशा दोन्ही वेळी राष्ट्रगीत वाजवले जाते. मात्र, या वेळी राष्ट्रगीत चार वेळा वाजवले जाणार आहे. केंद्र सरकारने नवीन नियम पाठवले आहेत. त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा या अधिवेशनात होणार आहे. राज्यपाल अभिभाषणासाठी निघतील, त्या वेळी राजभवनावर त्यांना ‘नॅशनल सॅल्यूट’ दिला जाईल. त्यानंतर विधानभवनात आल्यानंतर तेथेही पोलीस बँडच्या सहाय्याने त्यांना ‘नॅशनल सॅल्यूट’ दिला जाईल. त्यानंतर राज्यपाल सभागृहात येतील, त्या वेळी राष्ट्रगीत होईल. राज्यपालांचे भाषण झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री आभार प्रदर्शन करतील, त्यानंतर पुन्हा राष्ट्रगीत होईल. > ...तर सेनेने सत्तेतून बाहेर पडावे - विरोधी पक्षनेते मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ असताना, भाजपा-शिवसेना सत्तेच्या वाटमारीत मश्गूल आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत राहून शिवसेना विरोधकाची भूमिका बजावू पाहत आहे. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला शिवसेनाही तितकीच जबाबदार असून, ग्रामीण भागाची जराही चाड असेल तर शिवसेनेने ताबडतोब सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधकांनी दुष्काळ, चारा छावण्या, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सरकारचा कारभार मात्र संवेदनशून्यपणे सुरू आहे. दुष्काळी भागाला दिलासा देण्याऐवजी प्रशासनाला हाताशी धरून दुष्काळच दाबण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. कायदा-सुवव्यस्थेच्या मुद्द्यावर बोलताना मुंडे म्हणाले की, राज्यात पोलीसच सुरक्षित राहिलेले नाहीत. सत्ताधारी पक्षातील लोकच पोलिसांना मारहाण करीत आहेत, तर कुठे पोलिसांची धिंड काढली जात आहे. यातून सत्ताधारी पक्षाची गुंडगिरी दिसून येते. डान्सबार बंदीबाबत सरकारच्या भूमिकेवरच शंका असून, जर सरकारला खरोखरीच डान्सबार बंदी हवी असेल तर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात १५ मार्चपर्यंत डान्सबार बंदीचा कायदा नव्याने आणावा. त्याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षातील सदस्य एकमताने पाठिंबा देतील. मुंबई महापालिकेत रस्ता आणि नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्र्यांना याबाबतची कागदपत्रे आणि निवेदने दिली आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री पालिकेतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे मागील १० वर्षांतील पालिकेच्या कामाचे ‘विशेष लेखापरीक्षण’ करावे आणि महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. > दुष्काळाचे राजकारण कशाला? - मुख्यमंत्रीदुष्काळासारख्या विषयावर राजकारण करण्यापेक्षा संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी असणे आवश्यक आहे. केवळ बोट दाखवू नका, विधिमंडळात सकारात्मक सूचना करा आणि त्या स्वीकारू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांना केले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आम्ही दुष्काळी पर्यटन केलं, असा आरोप करणाऱ्या विरोधकांनी किमान नवीन काही शब्द तरी वापरायला हवे होते. विरोधी पक्षांचा आमचा अनुभव जादा आहे. कमी पडत असतील तर आमच्याकडून शब्द घ्या. टँकर आणि चाराछावण्यांचेही पूर्ण पैसे दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागात अख्खं मंत्रिमंडळ पोहोचले,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. आघाडी सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या उपाययोजना आणि आम्ही केलेल्या उपाययोजनांची तुलनाच होऊ शकत नाही.‘मेक इन’वेबसाइटवर : मेक इन इंडिया सप्ताहात राज्यात किती औद्योगिक गुंतवणूक होणार, कोणते उद्योग येणार, याबाबतची माहिती शासनाच्या वेबसाइटवर टाकली जाईल. ते आम्हाला सांगूनच गेले होते : रासपचे नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशंसा केली, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मीडियाने केवळ तेवढेच दाखविले, त्यांनी टीका केल्याचे दाखविलेच नाही. जानकर वगैरे आम्हाला भेटून; सांगूनच तिथे गेले होते.’
शिवसेनेची भाजपाला गुगली
By admin | Published: March 09, 2016 5:36 AM