मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनच्या वाट्याला 12 मंत्रिपदे मिळाली आहेत. तर अनेक शिवसेनेचे आमदार मंत्रिमंडळात आपला समावेश न झाल्याने नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेना आमदार व मंत्री अब्दुल सत्तार हे दुय्यम दर्जेची खाती मिळाल्याने नाराज असल्याचे समोर आले होते. मात्र याच मुद्यावरून भाजपचे नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
ठाकरे सरकारमध्ये दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. मात्र शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नाराज झाले नसते. कारण शिवसेनेला 50 टक्के मंत्रिपदे मिळाली असती. परंतु, निवडणुकीच्या आधीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठरले होते, असे तावडे म्हणाले. चिपळूण येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तर याचवेळी त्यांनी काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला, काँग्रेसने बाबरीचे समर्थन केले. राममंदिराला विरोध केला होता. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास कधीही परवानगी दिली नसती. असेही तावडे म्हणाले.
तसेच जेएनयूवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. तर जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. मात्र जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.