उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांनी विधान परिषद सदस्यपदही सोडल्याची घोषणा केली. त्यांचा राजीनामा घेऊन मंत्री अनिल परब हे राजभवनाकडे गेल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा करताच ताज हॉटेलमध्ये जमलेल्या भाजपा आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
विखेपाटलांनी यावर औरंगाबादचे नामकरण करणे हे आता सुचले, आधी का नाही केले, असा सवाल करत हे सरकार विश्वासघातातून बनलेले होते. त्यांच्याच नेत्याने, एकनाथ शिंदेंनी धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्याची घोषणा
मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मोठं केले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्याने पुण्य मिळत असेल ते त्यांना मिळू द्या. हा आनंद कुणीही हिरावून घेऊ नये. मला मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा अजिबात नव्हती. मला खुर्चीला चिटकून बसायचं नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय, त्याचसोबत विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केली.