महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे बोलून दाखवला 'इरादा'; शिंदे-अजितदादांची डोकेदुखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:46 PM2024-07-11T12:46:12+5:302024-07-11T12:48:09+5:30
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महायुतीत आता आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे.
Maharashtra BJP ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्रात महायुतीतील कुरबुरी वाढू लागल्या आहेत. विधानसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे नेते आपआपल्या अपेक्षा जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८० ते ९० जागांची मागणी केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही १०० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महायुतीत आता आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण काल केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील भाजप नेत्यांनी आपण विधानसभेला कमीत कमी १८० जागा लढायला हव्यात, अशी आग्रही मागणी केल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला चांगलं यश मिळवायचं असेल तर महायुतीत आपल्या वाट्याला कमीत कमी १८० जागा यायला हव्यात, असा सूर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत आळवल्याची माहिती आहे. तसंच शिंदेंच्या शिवसेनेला ६० ते ७० जागा दिल्या जाव्यात आणि उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात याव्यात, असंही या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांना कळवल्याचं बोललं जात आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
सभापतीपदावरूनही रंगला वाद
मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी या अधिवेशनात निवडणूक होईल अशी शक्यता होती, मात्र महायुतीतील तीन पक्षांतील मतभेदांमुळे या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा तीनही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला चालू पावसाळी अधिवेशनातच सभापतीपदाची निवडणूक घ्यायची होती. निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांना देण्यासाठी विनंतीपत्र ही मागील आठवड्यात तयार करण्यात आले होते. मात्र शिंदे सेना आणि अजित पवार गटाने या पदावर दावा सांगितल्याने राज्यपालांकडे ते विनंतीपत्र अद्याप पाठवण्यात आलेले नाही.
संख्याबळानुसार भाजप दावेदार
विधानपरिषदेत महायुतीत भाजपचे सर्वाधिक १९ आमदार आहेत, तर अजित पवार गटाकडे ६ आणि शिंदेसेनेकडे ३ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजपने सभापती पदावर दावा सांगितला. दुसरीकडे विद्यमान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करताना त्यांना सभापतीपद देण्याचा शब्द दिला होता.