यदु जोशी, मुंबईमहाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी त्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळवायचे, तर आधी शिवसेनेकडून जागा खेचून आणाव्या लागतील़ पण याबाबत शिवसेनेशी कोणी बोलायचे, असा पेच भाजपामध्ये निर्माण झाला आहे.भाजपाला जागा वाढवून हव्या आहेत, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यापासून ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यापर्यंत अनेक नेते राज्यभर सांगत आहेत, पण त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन भेटायला कोणीही तयार नाही. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर जाऊन आपल्याला हवे ते मिळवून घेण्याची ताकद असलेला नेता भाजपामध्ये उरलेला नाही, हे या दिरंगाईमागील मुख्य कारण मानले जाते. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चांमध्ये कुठलाही हस्तक्षेप न करण्याची भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा विषय दिल्लीत जाईल तेव्हाच मोदी, शहा आणि गडकरी लक्ष घालतील, असे मानले जाते. तथापि, जागा वाढवून घेण्याची मागणीच अद्याप स्थानिक नेत्यांनी मातोश्रीवर पोहोचविलेली नसल्याने त्यासाठी दबाव निर्माण करणे दूरच आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काही वर्षांपूर्वी भाजपाच्या मुख्यालयात गेले ते विनोद तावडेंच्या पुढाकाराने घडले होते, अशी अढी मातोश्रीच्या मनात अजूनही कायम आहे. फडणवीस, पंकजा मुंडे हे त्या मानाने नवखे आहेत. विधिमंडळातील शिवसेनेच्या नेत्यांशी चांगले संबंध असलेले खडसे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी निकटचे संबंध राहिलेले नाहीत. परवापर्यंत मुंडेच मातोश्रीशी बोलत असल्याने दुसऱ्या कुठल्या नेत्याला ती जबाबदारी देण्यात आलेली नव्हती.
भाजपा नेत्यांना ‘मातोश्री’ दूरच!
By admin | Published: August 14, 2014 3:16 AM