Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:15 PM2019-11-28T12:15:56+5:302019-11-28T14:13:58+5:30
विकासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभार्तीत मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर राज्यात सुद्धा भाजपचीचं सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास भाजपला होता. तर तसं वातावरण सुद्धा पाहयला मिळत होते. त्यामुळं निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मेगाभरतीतून भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र आता हातची सत्ता गेल्यानं भाजपमध्ये आलेल्या आयारामांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्याने, राज्यात सुद्धा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये महाभरती झाली.
विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभरतीत मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यात काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, वैभव पिचड व राणा जगजीतसिंह पाटील यांचा समावेश होता.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष सुद्धा ठरला. मात्र आलेले निकालाचे आकडे पाहता सत्तास्थापनेची चावी शिवसनेच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले होते. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची सरकार स्थापनेचा निर्णय घेतला असून काही तासात शपथविधी सोहळा सुद्धा पार पडणार आहे.
तर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर मोठी नामुष्की ओढवली असून, त्यांना पुन्हा एकदा विरोधातच बसावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या आयारामांना विरोधीपक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.