मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:18 AM2020-12-15T02:18:31+5:302020-12-15T06:45:54+5:30
हा आकडा चुकीचा - अजित पवार; कोरोनात उधळपट्टी - देवेंद्र फडणवीस
मुंबई : मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील त्यांच्या दालनांवर ९० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. मी माहिती घेतली. खर्चाचा हा आकडा चुकीचा आहे, हे आकडे येतात कुठून, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बंगल्यांवर नेहमीच कामे सुरू असतात, डागडुजीही होत असते, पण राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना एवढा खर्च करणे उचित नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे हे सरकार कंत्राटदारधार्जिणे असल्याचे लक्षण आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आरोग्य विभागाच्या तरतुदीतील ५० टक्केही निधी खर्च केलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला, असे दरेकर म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मंत्र्यांचे बंगले ही त्यांची खासगी मालमत्ता नाही. ते जुने असल्याने दर दोन-तीन वर्षांनी त्यांची डागडुजी करावी लागते.
धनंजय मुंडेंचा खुलासा
मला आठ दिवसांपूर्वीच चित्रकूट बंगल्याचा ताबा मिळाला. मी अद्याप तिथे एक रुपयाचाही खर्च केलेला नाही, असा खुलासा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.
मंत्री (बंगल्याचे नाव) मंजूर खर्च
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- (वर्षा) ३.२६ कोटी रु.
नवाब मलिक- (मुक्तागिरी) ८८ लाख
अनिल देशमुख- (ज्ञानेश्वरी) १ कोटी १ लाख
सुभाष देसाई- (शिवनेरी) १ कोटी ४४ लाख
नितीन राऊत- (पर्णकुटी) १ कोटी २२ लाख
राजेश टोपे- (जेतवन) १ कोटी ३० लाख
डॉ. राजेंद्र शिंगणे- (सातपुडा) १ कोटी ३३ लाख
एकनाथ शिंदे- (नंदनवन) २ कोटी ८० लाख
बाळासाहेब थोरात- (रॉयलस्टोन) २ कोटी २६ लाख
अजित पवार-(देवगिरी) १ कोटी ७८ लाख
छगन भुजबळ- (रामटेक) १ कोटी ६७ लाख
जयंत पाटील- (सेवासदन) १ कोटी १९ लाख
दिलिप वळसे पाटील- (शिवगिरी) ९३ लाख
अशोक चव्हाण- (मेघदूत) १ कोटी ४६ लाख
देवेंद्र फडणवीस- (सागर) १ कोटी ४ लाख
निधी परत...
मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चाची चर्चा असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या डागडुजीवर ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर मोठा खर्च केला जात असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी २७ लाखांचा धनादेश परत पाठवून दिला होता.