"भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली’’, हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:02 IST2025-03-17T17:00:00+5:302025-03-17T17:02:05+5:30

Harshvardhan Sapkal Criticize BJP: मी औरंगजेब व फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली तर भाजपाचे नेते फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली, असा कांगावा करत देवेंद्र फडणवीस यांनाच औरंगजेब ठरवत आहेत. काल रत्नागिरीत आणि त्यापूर्वी ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रेदरम्यानही मी हेच विधान केले होते, असेही सपकाळ म्हणाले.

"BJP leaders themselves compared Devendra Fadnavis to Aurangzeb" Harshvardhan Sapkal stands by his statement | "भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली’’, हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम  

"भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली’’, हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम  

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद उफाळून आला आहे. तसेच सत्ताधारी भाजपाने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगत भाजपालाच प्रतिटोला लगावला आहे. ते म्हणाले की,  महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरू आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे, या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेबावर बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पोटदुखी का झाली. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला नाही. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही तरीही भाजपाचे नेते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. औरंगजेब व फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली तर भाजपाचे नेते फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली, असा कांगावा करत देवेंद्र फडणवीस यांनाच औरंगजेब ठरवत आहेत. काल रत्नागिरीत आणि त्यापूर्वी ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रेदरम्यानही मी हेच विधान केले होते, असेही सपकाळ म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते ते बावनकुळेंनी सांगावे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का, कोरटकर, सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर बावनकुळे का बोलत नाहीत. काँग्रेस पक्षाला संस्कृती आहे, मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख हा भाजपाचा बुथ प्रमुख होता पण त्यांच्या हत्येनंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सुद्धा गेले नाहीत, उलट त्यांनी मांडवली करण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष म्हणून देशमुख कुटुंबांचे सांत्वन करून तेथून सद्भावना यात्रा काढली. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे पण बावनकुळे, नारायण राणे यांनी मात्र माझ्यावर पातळी सोडून टीका केली आहे, यातून भाजपाचा खरा चेहरा पुढे आला आहे.

औरंगजेब हा क्रूर शासक होता यात दुमत नाही पण याच क्रूरकर्मा औरंजेबाला मराठी मातीत गाढले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व इतिहास आहे. हा इतिहास व महाराजांचे शौर्य पुसण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. औरंगजेब जेवढा क्रूर होता तसेच ब्रिटीश होते मग ब्रिटीश सरकारला मदत करणाऱ्या संस्था, संघटना व नेते यांची स्मारके, पुतळे आणि संस्था उखडून टाकण्याचे धाडस बजरंग दल व विश्व हिंदू परिषद करणार का? असा सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: "BJP leaders themselves compared Devendra Fadnavis to Aurangzeb" Harshvardhan Sapkal stands by his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.