मुंबई - मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिले आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. या घडामोडीमुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्रातही काही दिवसांत मध्यप्रदेशची पुनरावृत्ती होईल, असा आशावाद भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. भाजप नेत्यांच्या या आशावादावर धनंजय मुंडे यांनी कडाडून टीका केली आहे.
मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपच्या राज्यातील आणि दिल्लीतील नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, हे कदाचित त्यांना ठावूक नाही. सरकार पाडण्यासाठी मुहुर्त शोधणे माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे काम आहे. अशी कितीतरी मुहूर्त शोधली आहेत. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या राजकीय बदलाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपने एप्रिलपर्यंतच काय दिवाळीपर्यंत घेतला तरी चालेल. पण महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना मध्यप्रदेश सारखा आनंद घेता येणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटले. ते माध्यमांशी बोलत होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता मध्य प्रदेशमधील पडसाद महाराष्ट्रात देखील उमटणार असल्याचे मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. तर भाजपचे इतर नेतेही मध्यप्रदेशची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, अशी शक्यता व्यक्त करत आहेत. त्याला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.