धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शरद पवारांवरील विधानावर आता भाजपाच्या एका नेत्याने पवारांचे समर्थन करत पडळकरांना सुनावलं आहे.
शरद पवार यांच्यावर टीका ही दुर्दैवी आहे असं मत मधुकर पिचड यांनी व्यक्त केलं आहे. आपण भाजपा पक्षात जरी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना जवळून पाहिलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे असं पिचड यांनी म्हटलं आहे. "गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दु:ख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे" असं देखील पिचड यांनी म्हटलं आहे.
"आपण भाजपा पक्षात जरी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी भरीव काम केले आहे. त्यांचे हे योगदान नाकारून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे. शरद पवार यांच्यावर राजकीय टीका अनेक वेळा झाली असेल पण ते निश्चल आहेत. अशा प्रकारच्या टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. छोट्या कार्यकर्त्यांना माझ्या नेहमी सूचना असतात, मोठ्या माणसांवर बोलताना आपली कुवत पाहून मर्यादा पाळाव्यात" अशा शब्दांत पिचड यांनी पडळकरांना फटकारलं आहे.
गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील विधानानंतर धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी पडळकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता धनगर समाजाचे आणखी एक नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलं आहे, ते त्यांच वैयक्तिक मत आहे. ती संपूर्ण धनगर समाजाची भूमिका नाही. तसेच बहुजन समाजातील नेते संपवणे हे भाजपाचे पाप आहे, असा आरोप देखील प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतूनच सुटणार आहे. भाजपाची केंद्रात सत्ता आहे. मग धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. उत्तम जानकर यांच्यासह आता प्रकाश शेंडगे यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने गोपीचंद पडळकरांना दुहेरी धक्काच बसल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं...
...अन् चिमुकल्याच्या मृतदेहाला कवटाळत पित्याचा आक्रोश, मन सुन्न करणारी घटना
विशाखापट्टणम पुन्हा हादरलं! वायू गळतीमुळे दोन जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ
संतापजनक! ई-पास मागितला म्हणून नेत्याची दादागिरी, पोलिसाला केली धक्काबुक्की; Video व्हायरल
काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल