"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 08:26 PM2023-07-25T20:26:25+5:302023-07-25T20:27:42+5:30

"देशातील जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत"

BJP Maharashtra Chief big statement about alliance with Eknath Shinde Ajit Pawar in upcoming elections | "येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

googlenewsNext

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या भाजपा - शिवसेना (एकनाथ शिंदे गट) - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. महायुतीच्या या सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. सुरूवातीला शिंदे गट आणि भाजपा यांच्यात वाद असल्याचे बोलले जात होते. तशातच अजित पवार गटाच्या प्रवेशानंतर आता हा अंतर्गत कलह अधिक वाढल्याच्या चर्चा आहेत. या दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आगामी निवडणुका आणि महायुतीतील घटक पक्षाचे उमेदवार यांच्या संबंधातील हे वक्तव्य आहे. (BJP - Eknath Shinde - Ajit Pawar)

काय म्हणाले भाजपा प्रदेशाध्यक्ष?

"निवडणुकीच्या वेळी महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपा आपल्या उमेदवाराला जेवढी ताकद देईल, त्यापेक्षाही अधिक ताकद महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवाराला देईल. २०२४ मध्ये मोदीजी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील ४५पेक्षा अधिक खासदार असतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायगड, बारामती, शिरूर आणि शिर्डी यांच्यासह हातकंगणले, कोल्हापूर, माढा , सातारा या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज त्यांनी पुणे येथे घेतली. त्यावेळी त्यांनी याबाबत मत मांडले.

बावनकुळे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा बुथस्तरापर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची रचना करीत आहोत. लोकसभा प्रवास योजनेत ५०० पेक्षा अधिक पदाधिकारी व त्यांची टीम काम करणार आहे. त्यासाठी संपर्क से समर्थन व नवमतदार नोंदणी केली जात आहे. राज्यातील व केंद्रातील मंत्री आगामी २ महिन्यात राज्याचा दौरा करतील. राजकीय व विकासात्मक तयारी केली जात आहे. जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम केले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली. तर आगामी वर्षभरात ५० हजार रुग्णमित्र तयार केले जातील. मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी मतदार साथ देत आहेत."

"उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये आले तेव्हा ते सर्व बाबींचा विचार करून आले आहेत. महायुतीवर शंका घेण्याचे कारण नाही, महायुती कमजोर होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. जागा वाटपाचा संपूर्ण अधिकार हा केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. राज्यातील तिन्ही नेते व केंद्रीय संसदीय बोर्ड उमेदवार ठरवितील. देशातील जनतेला मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत. मोदींच्या नवभारताच्या संकल्पाला साथ देण्याकरिता मतदान केंद्रावर जाऊन मतदार कमळाचेच बटण दाबणार आहेत. आम्हीही त्यासाठी काम करीत आहोत. भाजपासोबतची महायुती वर्षानुवर्षे चालणार. चिन्हाचा कोणताही वाद नाही," असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

२०२९ पर्यंत कॉंग्रेसला संधी नाही!

"कॉंग्रेसची अवस्था वाईट आहे. कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेता ठरविता येत नाही. त्यासाठी ब्लड टेस्ट करतील. त्या पक्षात प्रचंड असंतोष आहे. कॉंग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो. २०२९ पर्यंत कॉंग्रेसला कोणतीही संधी नाही हे त्यांनाही माहिती आहे," असे ते म्हणाले.

Web Title: BJP Maharashtra Chief big statement about alliance with Eknath Shinde Ajit Pawar in upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.