इंडिया आघाडीच्या मुंबईत आजपासून दोन दिवस होणाऱ्या बैठकीत या आघाडीच्या संयोजकांचे नाव निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐनवेळी काही नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर येऊ शकते. इंडिया आघाडी होऊन काही महिने झाले असले तरी संयोजकांच्या नावावर एकमत होऊन त्यांची घोषणा होऊ शकलेली नाही. याच दरम्यान भाजपाने घणाघात केला आहे.
"बाळासाहेबांनी जे कमावलं, उद्धवरावांनी ते गमावलं, आदित्यने धुळीला मिळवलं, ज्वलंत हिंदुत्ववादी ते ढोंगी पुरोगामित्त्वाचा किळसवाणा प्रकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बाळासाहेबांचा वारस असलेल्या उद्धव ठाकरेंना असाकाही सत्तामोह झालाय की, बाळासाहेब ज्या देशविघातक तत्वांविरोधात आयुष्यभर लढले. त्यांच्यासाठी त्यांचाच पुत्र उद्धव पायघड्या आंथरत आहे. बाळासाहेब हिंदू शेर म्हणून देशभर लोकप्रिय होते तर, "उद्धव" टोमणेबाज म्हणून नावारूपाला आलेत" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे.
"स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत पाकिस्तान धार्जिणे, देशविरोधी तत्वांची मुंबईत येण्याची हिंमत होत नसायची. पण आता दुर्दैवाने बाळासाहेब आपल्यात नाहीत, तर मुंबईत सत्तेच्या हव्यासाने पाकिस्तान धार्जिणे, देशविरोधी तत्व मुंबईकडे निघाली. बाळासाहेबांचा वारस असलेल्या उद्धव ठाकरेंना असाकाही सत्तामोह झालाय की, बाळासाहेब ज्या देशविघातक तत्वांविरोधात आयुष्यभर लढले. त्यांच्यासाठी त्यांचाच पुत्र उद्धव पायघड्या आंथरत आहे. बाळासाहेब हिंदू शेर म्हणून देशभर लोकप्रिय होते तर, "उद्धव" टोमणेबाज म्हणून नावारूपाला आलेत."
"अखंड भारताला कलंक असलेल्या आर्टिकल 370चे समर्थन करणारे फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती उद्धव ठाकरेंसाठी विशेष अतिथी झालेत. ज्या ज्या नेत्यांना पाकिस्तानबद्दल विशेष प्रेम आहे. ते सर्व घमंडिया गठबंधनमध्ये सामील झालेत आणि उद्धव ठाकरे व शरद पवार त्यांचे सेवेकरी. स्वर्गीय बाळासाहेब नेहमी सांगायचे की ज्या दिवशी त्यांना त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा करण्याची वेळ येईल, तेव्हा ते त्यांचा पक्ष बंद करतील. पण सध्या घमंडिया गठबंधनची अशी काही झापडं त्यांच्या पुत्राच्या डोळ्यावर आहे की उद्धव ठाकरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेऊ लागलेत."
""विनाश काले विपरीत बुद्धी"मराठी जनतेने बाळासाहेबांनी मुंबईतून देशबंदची हाक देऊन, संपूर्ण देश बंद होताना पाहिलाय. अगदी पाकिस्तानचा विरोध करायला खेळपट्ट्या उखडणारे शिवसैनिक पाहिलेत. आता मराठी जनता "देशविरोधी लोकांची" हुजरेगिरी करणारे, "सोनिया" गांधीसमोर वाकणारे उद्धव ठाकरे पाहत आहेत, हेच काय दुर्दैव" असं भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.