उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
नागपुरातील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. यावर बोलताना बावनकुळेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली. "उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत", असे बावनकुळेंनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले.
फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक - ठाकरे उद्धव ठाकरेंनी सोमवारी नागपुरात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले की, इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय. काय परिस्थिती आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर काय बोलायचे. त्यांची स्थिती अशी विचित्र झालीय की सहनही होत नाही अन् काय झालेय असे विचारले तर काही नाही काही नाही असे सांगतात. पण झालेय काहीतरी हे नक्की. मी पुन्हा येईन असे बोलले होते. मी एकटा नाही आलोय, दोघांना घेऊन आलोय असे फडणवीस म्हणाले होते. मी त्यांची एक क्लिप दाखवतो असे सांगत 'नाही नाही नाही... एकवेळ लग्न करणार नाही... ही फडणवीसांची क्लिप दाखवली. यानंतर फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहे, असे ठाकरेंनी म्हटले.