शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ३ जानेवारी रोजी "छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य" हा अग्रलेख छापण्यात आला होता. पण या अग्रलेखातील माहिती ही विकिपीडियावरील मजकूर कॉपी करुन वापरल्याचं आता समोर आलं आहे. यावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत य़ांना देखील टोला लगावला आहे. "हीच का ती रश्मी ठाकरे यांच्या सामनाच्या संपादकाची हुश्शारी..!" असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र भाजपाने आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. सामना अग्रलेखातील माहिती आणि विकिपीडियावरील मजकूर याचे फोटो शेअर करत थेट पुरावाच दिला आहे. "वा रे, सर्वज्ञानी... संजय राऊत कार्यकारी संपादक साहेब! चक्क विकिपीडियावरील मजकुराची कॉपी करुन अग्रलेखात वापरावी लागणे, हीच का ती #रश्मीठाकरे यांच्या #सामना च्या संपादकाची हुश्शारी..! दुसऱ्यांना आत्मपरिक्षणाचे धडे देणाऱ्यांनी किमान स्व ज्ञानात भर घालावी" असं भाजपाने म्हटलं आहे.
"शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते."
"अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले. दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले" हा मजकूर कॉपी करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"