भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणारसोलापूर : सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनीच्या पाण्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याने आजही शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा वचननामा जाहीर कार्यक्रमानिमित्त सुभद्रा मंगल कार्यालय येथे रघुनाथ कुलकर्णी बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, आंध्रप्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस के. नीलकंठ,विश्वनाथ बेंद्रे, मल्लेशाप्पा कावळे, रामचंद्र जन्नू, बाशा शेख, प्रभाकर जामगुंडे, दत्तात्रय गणपा, मोहन डांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रघुनाथ कुलकर्णी म्हणाले की, मागील काळातील पाणी समस्या पाहिली तर भविष्यात ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेचा उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी योजना आखल्या जाणार आहेत. शहराचा सर्व्हे करून उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यावर भर असणार आहे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महापालिकेचा सर्व कारभार हा आॅनलाईन केला जाईल. मनपाच्या अर्थसहाय्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहोत. शहराचा सर्वांगीण विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास आहे असे यावेळी रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. पारदर्शक व स्वावलंबी कारभार, शुद्ध आणि विपुल पाणीपुरवठा, हिप्परगा तलावामार्फत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व सांडपाणी पुनर्वापर योजना, अग्निशामक दल, रस्ते, कचरामुक्त सोलापूर- हरित सोलापूर, भाजी मंडई, स्वच्छतागृहे, पर्यटन विकास, वस्तूसंग्रहालय, सांस्कृतिक विकास, महापौर निधीची निर्मिती, मैदाने आणि क्रीडांगणे व उद्याने, निरोगी सोलापूर, रुग्णसेवा, परिवहन सेवा, बसस्थानक आणि आधुनिक बसपोर्ट, स्मशानभूमी सुधारणा, व्यापार संकुले, शिक्षण, बचत गट आणि महिला कल्याण आदी विविध विकासकामे करण्याचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. ------------------------जनता एकहाती सत्ता देणारसोलापूरची जनता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली आहे. जनतेला बदल हवा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने स्वीकारले आहे. भारतीय जनता पार्टीचा वचननामाच खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकासनामा ठरेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.
भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणार
By admin | Published: February 16, 2017 6:33 PM