Maharashtra Govt Decision on Heat Stroke: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर, अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. या घटनेनंतर आता सरकारला उपरती झाली असून, सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या संख्येवरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहे. सरकार खरा आकडा लपवत आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यातच आता सरकारने बॅकफूटवर जात एक मोठा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाची वेळ निवडण्यातच आयोजकांनी आणि सरकारने चूक केल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांना याची माहिती दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्देश
भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. याबाबत बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना घडेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे काही घडले, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, म्हणून सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उन्हाची दाहक स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या जागेत कोणताही कार्यक्रम घेऊ नये, हा चांगला निर्णय आहे. जनतेने या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
प्रयत्न केले, पण जे घडले ते दुर्दैवी
ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे, त्या ठिकाणी असे काही घडेल, याची १ टक्काही कल्पना नव्हती. प्रयत्न सर्व केले गेले, पण जे घडले ते दुर्दैवी आहे. विरोधक त्यांचे राजीनामा मागण्याचे काम करत आहेत. परंतु, अशा घटनेच्या पुनरावृत्ती होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, यासाठी सरकारने जीआर काढला आहे. आम्ही पुढे काळजी घेऊ, असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"