Mangalprabhat Lodha: आज प्रश्नोत्तराच्या तासात भाजपाचेनिरंजन डावखरे यांनी प्रश्न विचारला, "शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी माझा प्रश्न आहे. जनगणनेचे काम अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. त्याऐवजी या कामासाठी या बेरोजगारांना शासन समाविष्ट करून घेणार का? या संदर्भात एखाद्या पॉलिसीचा शासन विचार करणार आहे का?" या प्रश्नाचे उत्तर राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आणि त्यावेळी त्यांनी मिस्कील भाषेत टिपण्णी केल्यानंतर हशा पिकला.
विविध प्रश्नांची उत्तरे देताना मंगलप्रभात लोढा मिस्किलपणे म्हणाले, "सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभं केलं आहे आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा कारण त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही" मंगलप्रभात लोढा यांच्या या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला. "तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईन. दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे" असे उत्तरही त्यांनी दिले. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
दरम्यान, याआधी आज सकाळी सदनात दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत सभागृहात चर्चा झाली. या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली मते मांडली आणि काही प्रश्न उपस्थित केले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने हा मार्ग चौपदरी करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला. यावर सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय, मेटे यांच्या मृत्यूसंदर्भातील तपासाला धरूनही त्यांनी काही मुद्दे मांडले.
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासाबद्दल अधिकची माहिती देताना आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अपघात झाल्यानंतर मेटेंच्या ड्रायव्हरने जेव्हा ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला तेव्हा नवी मुंबई पोलिस मदतीसाठी तातडीने निघाले होते. पण अपघाताच्या धक्क्यामुळे ड्रायव्हर काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की लोकेशन सांगता आले नाही. आम्ही पनवेल जवळ आहोत इतकंच तो सांगू शकला. अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी बराच शोध घेतला. त्यानंतर रायगड पोलिसांनाही माहिती दिली. रायगड पोलीसही मदतीसाठी निघाले होते. या दरम्यान एक्सप्रेस वे चे व्यवस्थापन पाहणाऱ्या IRB कंपनीला अपघाताची माहिती मिळाली. त्यांची मदत लगेच तिथे पोहोचली पण दुर्दैवाने रूग्णालयात पोहोचेपर्यंत मेटे यांचे निधन झाले होते. त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा घडून नयेत म्हणून ITMS सिस्टीमचा वापर केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.